
सोलापूर, 24 मे (हिं.स.)। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकांच्या प्रशासकीय बदलीविरोधात संघटनेकडून आझाद मैदानावर विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाची शासनाने दखल घेत परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती दिली आहे. यापुढे विनंती आणि तक्रारीनुसारच बदली करण्यात येईल, असे शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रशासकीय बदलीमुळे परिचारिकांचा जिल्हा बदल होत असल्याने त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर तसेच मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा संघटनेकडून उपस्थित करण्यात आला होता. या संदर्भातमनीषा शिंदे,सुमित्रा तोटे, भीमराव चक्रे, हेमलता गजबे आणि अरुण कदम यांच्या नेतृत्वाखाली शासनाविरोधात आंदोलन छेडण्यात आले होते.
संघटनेकडून प्रशासकीय बदलीमुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या मागण्यांची शासनाने गंभीर दखल घेत परिचारिकांच्या बदल्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.यापुढे परिचारिकांच्या बदल्या केवळ विनंती आणि तक्रारीच्या आधारेच करण्यात येणार असल्याने संघटनेच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या निर्णयानंतर संघटनेकडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षा संध्या गावडे, सचिव आशा माने, कार्याध्यक्षा अंजली पाटील, शशिकांत साळवी, विरेश महाजनी, ज्योती चावरिया, सविता राठोड, विल्यम गायकवाड, प्रिती ससाणे, संध्या जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड