
पुणे, 24 मे (हिं.स.)। पीएमपी प्रशासनाने प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रथमच दोन सॉफ्टवेअर प्रणालींचे एकत्रीकरण केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. रस्त्यावर धावलेल्या १,७७० बसपैकी तब्बल ९३ टक्के बस वेळेत धावल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.बसमधील जीपीएस यंत्रणा आणि वाहकांकडील ईटीएम मशीनच्या सॉफ्टवेअरला परस्पर जोडण्यात आल्याने बस संचालनात मोठी सुधारणा झाली आहे. या एकत्रीकरणामुळे एकाच मार्गावर अनावश्यकपणे जास्त बस धावणे किंवा कमी प्रवासी असलेल्या फेऱ्यांचे नियोजन अशा त्रुटींवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे.पूर्वी बस वेळापत्रकाची जबाबदारी आगार व्यवस्थापकांकडे असल्याने मानवी हस्तक्षेपामुळे परिचालनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या समस्यांवर उपाय म्हणून पीएमपी प्रशासनाने ‘इबिक्स’ आणि ‘कार्गोएफएल’ या दोन रिअल टाइम डेटाबेस सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण केले आहे. यामुळे बस संचालनाचे नियोजन अधिक अचूक आणि परिणामकारक झाले आहे.
महेश आव्हाडयांनी सांगितले की, “सॉफ्टवेअर एकत्रीकरणाचा फायदा आता स्पष्टपणे दिसत आहे. बस वेळेत धावण्याचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्याही वाढली आहे. कोणत्या कंत्राटदाराच्या किती बस सुरू आहेत, किती फेऱ्या रद्द झाल्या आहेत, याची माहिती तत्काळ उपलब्ध होत असल्याने संचालनाचे योग्य नियोजन करणे शक्य होत आहे.”या नव्या तांत्रिक बदलामुळे पीएमपीच्या सेवेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि प्रवाशांचा विश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु