
नांदेड, 24 मे (हिं.स.)।नांदेड जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सन २०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठी होणारी त्रैवार्षिक निवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, मतदार यादीतील त्रुटी आणि सभासदांच्या वाढत्या आक्षेपांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूचनेत देण्यात आली. या निवडणुकीसंदर्भात अनेक सभासदांनी गंभीर आक्षेप नोंदवले होते.
प्रक्रियेतील विसंगतींमुळे निवडणुकीला ब्रेक
राजेश्वर लोकावाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करत प्रक्रियेतील विसंगतींकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, दैनिक नवराष्ट्रनेही या प्रकरणातील गोंधळ, गटबाजी आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर वृत्तमालिका प्रसिद्ध करून विविध बाबी उघड केल्या होत्या. मतदार यादीत पात्र सभासदांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तर काही बंद पडलेल्या किंवा अस्तित्वात नसलेल्या फार्मसी फर्मची नावे यादीत समाविष्ट असल्याचेही समोर आले. याशिवाय अर्ज स्वीकृती प्रक्रियेत दुहेरी निकष लावले जात असल्याची तक्रारही सभासदांनी केली होती. वाढता असंतोष, सातत्याने होत असलेल्या तक्रारी आणि निष्पक्षतेवर उपस्थित झालेले प्रश्न लक्षात घेता अखेर निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा संघटनेत आहे. आता नव्याने होणारी निवडणूक पारदर्शक, नियमबद्ध आणि सर्व सभासदांचा विश्वास संपादन करणारी असावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis