
सोलापूर, 24 मे (हिं.स.)।सोलापूरच्या नई जिंदगी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि सोशल मीडियावर रील बनवून भाईगिरी दाखवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. कोयता आणि लोखंडी पाइपने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिसांनी भररस्त्यातून पायी धिंड काढत कारवाई केली. सैफ मुकदूम शेख असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या नई जिंदगी परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले होते. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले. यावेळी सैफ शेख आणि त्याचा साथीदार जैद शामू शेख यांनी मिळून फिर्यादी मुस्तफा जाकीर शेख याच्यावर लोखंडी पाइप आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुस्तफा गंभीर जखमी झाला.घटनेनंतर जखमी मुस्तफाने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, आरोपी सैफ शेख हा नई जिंदगी परिसरातच फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सैफविरोधात मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी परिसरात लोकांना धमकावणे, किरकोळ कारणांवरून वाद घालणे तसेच सोशल मीडियावर हत्यारांसह रील पोस्ट करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तो करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.त्याची ही भाईगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी त्याला वाहनात न बसवता भररस्त्यातून पायी चालवत नेले. पोलिसांच्या या कारवाईनंतर आरोपीची बोलती बंद झाली असून त्याने पोलिसांसमोर कान पकडून माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, “पोलीस गाडी दुसरीकडे पार्क केली असल्यामुळे आरोपीला पायी चालवत आणावे लागले,” असे अधिकृत स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र, या कारवाईमुळे परिसरातील गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड