
अमरावती, 24 मे (हिं.स.) भर उन्हाळ्यात एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणाचा फटका प्रवाशांना बसल्याची घटना शास्त्री चौक परिसरात आज घडली. धावत्या एसटी बसचे रेडिएटर अचानक लीक झाल्याने बस रस्त्यातच बंद पडली. कडक उन्हात पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांना सामानासह पायी चालत जावे लागले. याप्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एसटी बस आपल्या नियमित मार्गावरून जात असताना अचानक बसच्या रेडिएटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. रेडिएटर लीक झाल्यामुळे इंजिनचे तापमान झपाट्याने वाढले (ओव्हरहिटिंग) आणि पुढील धोका टाळण्यासाठी चालकाने बस शास्त्री चौक परिसरात रस्त्याच्या कडेला उभी केली. भरदुपारी तापमानाचा पारा चढलेला असताना बस बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. बस ज्याठिकाणी थांबली, त्या परिसरात सावली किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नव्हती. काही वेळ पर्यायी बसची वाट पाहूनही कोणतीही मदत न मिळाल्याने अनेक प्रवाशांनी अखेर पायी मार्गक्रमण सुरू केले. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना डोक्यावर कडक ऊन व हातात सामान घेऊन चालावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. तिकिटाचे पूर्ण पैसे घेतले जातात, मग गाड्यांची वेळेवर तपासणी का होत नाही?, उन्हाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया एका संतप्त प्रवाशाने दिली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बस देखभाल आणि तांत्रिक तपासणीच्या व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेषतः उन्हाळ्यात रेडिएटर, कूलिंग सिस्टम आणि इंजिनची नियमित तपासणी आवश्यक असताना, दुर्लक्षामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकारानंतर संबंधित आगार प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते आणि बसच्या तांत्रिक तपासणीबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी