
लातूर, 24 मे (हिं.स.)।
देवणी येथील तहसील कार्यालय परिसरातील शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे साठवलेल्या काळ्या मातीच्या लिलावात हेराफेरी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी जप्त केलेली साडेसात लाखांच्या दंडाची जेसीबी तहसील आवारातून गायब होऊन एक महिना उलटल्यानंतर, अखेर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासकीय काळ्या मातीची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने व एका ट्रॅक्टरवर दंड आकरण्यात आला होता. तो संबंधितांनी भरला. याच कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली एक जेसीबी तहसीलच्या आवारात उभी करण्यात आली होती. या जेसीबीवर साडेसात लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. परंतु, महिनाभरापूर्वी जेसीबी तहसीलच्या आवारातून गायब झाली.
कोट्यवधीची शासकीय मालमत्ता आणि जप्त केलेले वाहन चोरीला जाऊनही महसूल प्रशासनाने साधी तक्रारही नोंदवली नव्हती. यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासनाने तातडीने पावले उचलली. अखेर महसूल सेवक तुकाराम रामसणे यांच्यामार्फत देवणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द फिर्याद देण्यात आली. चोरीला गेलेल्या जेसीबीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही; म्हणून तक्रार देण्यास विलंब झाला, असे अजब कारण फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
संपूर्ण मातीचोरी आणि जेसीबी गायब प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येत नसल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणाची एखाद्या सक्षम आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis