
सोलापूर, 24 मे (हिं.स.)। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये विरोधाची भावना तीव्र होत असून, याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटीलयांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर परिसरात बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार मोहिते-पाटील यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना, अडचणी आणि मते जाणून घेतली.बैठकीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सामूहिकपणे हात वर करून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला.
“हा महामार्ग आमच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करणारा असून आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी ठामपणे मांडली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेती आणि उपजीविकेवर या प्रकल्पाचा होणारा परिणाम स्पष्ट करत संताप व्यक्त केला.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन ते स्वतः शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
“शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच या विषयावर माजी आमदाररणजितसिंह मोहिते-पाटीलआणि आमदारउत्तमराव जानकरयांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीचे प्रास्ताविक रिपाइं तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी केले. कार्यक्रमाला शंकरराव माने-देशमुख, दत्ता मगर, हनुमंत साळुंखे, कमलाकर माने-देशमुख, उत्तम काशिद, धनंजय माने-देशमुख, सुनील मुंगूसकर, नामदेव देवकते, मोहन भाकरे, अमृत माने-देशमुख, राजू देवकते, अमोल व्होरा, तुकाराम राऊत, विजय देशमुख, विजय टिके, भैय्या कोडग, विजय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाविरोधातील वाढता आणि आक्रमक होत चाललेला विरोध पाहता, या प्रकल्पाचे भवितव्य काय असणार, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड