सोलापुरातील नाराज गट आक्रमक; “सपकाळ हटाव” मोहीम राज्यभर राबविण्याचा इशारा
सोलापूर, 24 मे, (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ‘सुजन अभियान’ कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाल्याचा आरोप करत सोलापुरातील नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात “सपकाळ हटाव” मोहिम सुरू करण्याच
सोलापुरातील नाराज गट आक्रमक; “सपकाळ हटाव” मोहीम राज्यभर राबविण्याचा इशारा


सोलापूर, 24 मे, (हिं.स.)।

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ‘सुजन अभियान’ कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाल्याचा आरोप करत सोलापुरातील नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात “सपकाळ हटाव” मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या नियोजनातील गोंधळ, स्थानिक कार्यकर्त्यांना डावलणे आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणूनदेवाशिष पटनायकयांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ‘सुजन अभियान’ संदर्भात दिल्ली येथे निपक्षपाती अहवाल सादर केला होता. मात्र, त्यानंतरही राजकीय हस्तक्षेप करून नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप नाराज गटाने केला आहे.या संदर्भात देवाशिष पटनायक यांना विचारणा केली असता, “मी योग्य तो अहवाल दिला आहे. काही गडबड झाली असल्यास त्याचा पाठपुरावा दिल्ली दरबारी करेन,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमार्फत राबविण्यात येत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.काँग्रेसचे वरिष्ठ नेतेविजयकुमार हत्तुरेयांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत, “महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ पदावरून हटवावे,” अशी मागणी केली. दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न देणे, कार्यक्रमाची माहिती वेळेत न मिळणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याच्या आरोपांमुळे पक्षातील नाराजी अधिकच तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर “सपकाळ हटाव” मोहीम राज्यभर राबविण्याचा इशाराही नाराज गटाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande