
सोलापूर, 24 मे (हिं.स.)सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांदरम्यान आता थेट एस. कार्तिकेन यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून व्हाटस अपवर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून नागरिकांची फसवणूक किंवा अनधिकृत व्यवहार घडवून आणण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित फेक अकाउंटसाठी एका मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात येत असून, याबाबतची माहिती स्वतः जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी त्यांच्या अधिकृत व्हाटस अप स्टेटसद्वारे सार्वजनिक केली आहे. नागरिकांनी या नंबरवरून येणारे संदेश, कॉल किंवा आर्थिक मागण्या याकडे दुर्लक्ष करावे, संबंधित नंबर तात्काळ ब्लॉक करावा तसेच कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कुशल जैन यांच्या नावाने देखील अशाच प्रकारे फेक व्हाटस अप अकाउंट तयार करण्यात आले होते. त्या घटनेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर झाल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
सायबर गुन्हेगार आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख वापरून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. अधिकाऱ्यांचे नाव, फोटो आणि पदाचा वापर करून आर्थिक मदत, ओटीपी, बँक माहिती किंवा इतर संवेदनशील माहिती मागवली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सायबर फसवणुकीपासून बचावासाठी कोणत्याही अनोळखी नंबरवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये आणि त्वरित संबंधित नंबर ब्लॉक करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड