
अमरावती, 24 मे (हिं.स.)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची रणधुमाळी जिल्ह्यात सुरु झाली असून इच्छुकांनी आपापल्या परीने प्रचाराचा शुभारंभ केला. या शुभारंभातचहापूस आंब्याच्या पेटीसह पैठणी, समई, सोनपापडी, कपल घड्याळींचा संच घरपोहोच मिळाल्याने काही मतदार सदस्यांच्या तोंडाला पाणी सुटले असून त्यात काही नवीन सदस्यांनी चक्क 'फोर व्हीलर'ची डिमांड केल्याची माहिती आहे. निवडणूक प्रचारातच उमेदवाराला मतदार सदस्यांचा असा धक्कादायक ट्रेलर बघायला मिळाला असून या निवडणुकीत राजकीय अंकगणित व्यवहाराच्या रसायनशास्त्रापुढे निष्प्रभ ठरण्याचे चित्र दिसत आहे.
या निवडणुकीत निवडक आणि विशिष्ट मतदार असे एकूण ४५३ मतदार असल्याने त्यांनाविशेषस्वरूपातील भेटवस्तूंचेप्रलोभन देण्यावर उमेदवारांचा भर आहे. यामध्ये अगदी हापूस आंब्याच्या पेटीसह कपल घड्याळींचा संच, पैठणीतर कुणी समई आदी वस्तू भेट देऊन प्रचाराचा 'श्रीगणेशा' करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे उमेदवार निवडीपासून महायुतीतील अंतर्गत समन्वयापर्यंत आणि स्थानिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांपासून मतदारांच्या 'मानापानां' पर्यंत अनेक स्तरांवर हीनिवडणूक गाजणार आहे. यानिवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक संबंध, अर्थबळ, स्थानिक गटबाजी आणि 'व्यवस्थापन' कौशल्य अधिक प्रभावी ठरत असून 'रेटणार त्यालाच भेटणार' हे सूत्र या निवडणुकीचा मुख्य फॉर्म्युला आहे. त्यामुळे पहिल्या भेटीतच अनेक मतदार सदस्यांनी थेट इच्छुक सोबत असलेल्या अन्य सहकाऱ्यापर्यंत आपल्या मनातील 'डिमांड' बोलून दाखविल्याची विश्वसनीय सूत्राची माहिती आहे. यानिवडणुकीसाठी उद्या सोमवार २५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असून, १ जूनपर्यंत उमेदवारी दाखल करावी लागणार आहे; मात्र अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे अपक्ष म्हणूनही काही उमेदवार रिंगणात उतरणार आहे. या निवडणुकीसाठीमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य अर्थात नगरसेवकच मतदार असून, या सर्व मतदारांची एकूण संख्या केवळ ४५३ एवढी आहे. त्यामुळेप्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भेटीगाठी घेणे उमेदवारांना सहज शक्य असल्याने इच्छुक उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहचण्याची आतापासून स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळेच पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक समीकरणे, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक हितसंबंध त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे ठरत असल्याने अमरावतीमध्ये तुल्यबळ लढत झाल्यास घोडेबाजार वाढण्याची चिन्हे आतापासूनच दिसायला लागली आहे. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांना सुद्धा याबाबतची जाणीव आहे.एकूणच ही निवडणूक विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसारखी नाही. येथे मतदारांपर्यंत पोहोच म्हणजे पक्षाचा प्रचार नव्हे, तर वैयक्तिक संपर्क, व्यवहारकौशल्य आणि स्थानिक समीकरणे महत्वाची असतात. त्यामुळे मतदारांशी असलेले मधूर संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी किवा नवीन मतदारांशी मतदानाची नाळ जोडण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरले जाणे अपेक्षित आहे. निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांना साहजिकच मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यापैकी नव्याने निवडून आलेल्या काही नगरसेवकांना तर आता तो खर्च कसा भरून काढावा, असा यक्षप्रश्न पडला आहे. दरम दरम्यान, आता उमेदवारांकडून 'लक्ष्मीदर्शन' होणार असल्याने ही निवडणूक नगरसेवकांसाठी 'अर्थ'पूर्ण दिलासा देणारी ठरणार असून संधीचे सोने कसे होईल? याची आतापासून फिल्डींग लावणे सुरु केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी