पेपर फुटीत हातभार लावणाऱ्यांचे हात सरकारने छाटायला हवे! - बच्चू कडू
अमरावती, 24 मे (हिं.स.) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात गाजत आहे. त्यात महाराष्ट्रातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात शिकवणी वर्ग चालवणाऱ्या संचालकांचा, पेपर
”पेपर फुटीत हातभार लावणाऱ्यांचे हात सरकारने छाटायला हवे!”, आमदार बच्चू कडूंचे विधान


अमरावती, 24 मे (हिं.स.)

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात गाजत आहे. त्यात महाराष्ट्रातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात शिकवणी वर्ग चालवणाऱ्या संचालकांचा, पेपर सेट करणाऱ्या समितीतील प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यासंदर्भात सत्तारूढ शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी धक्कादायक विधान केले आहे. पेपरफुटीत हातभार लावणाऱ्यांचे हात सरकारने छाटायला हवे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू म्हणाले, परीक्षार्थी वर्ष-दोन वर्षे अभ्यास करतात. प्रचंड मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. पण, पेपर फुटला असे जेव्हा कानावर येते, तेव्हा किती वेदना होत असतात, हे परीक्षार्थ्यांना विचारायला हवे. पेपर फुटल्यानंतर सर्व काही हातातून निघून गेलेले असते. ज्याने पेपर फुटीचे हे सारे प्रकार घडवले, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या प्रकारे शिक्षा दिली जायची, तशाच प्रकारची शिक्षा दिली पाहिजे. ज्यांचा पेपरफुटीत हातभार असेल, त्याचे हात छाटण्याचे काम सरकारने केले पाहिजे. पुढे असा प्रकार करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. या तरूणांच्या डोक्यात काय असते, हे मला माहित आहे. पेपर फुटल्याचे कळताच या तरूणांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण होत असतो, असे बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी सरकारी नोकर भरतीतील भेदभावाविषयी भाष्य केले. बच्चू कडू म्हणाले, अनेक सरकारी पोर्टलमार्फत नोकरभरतीसाठी परीक्षा घेतली जाते. त्या ठिकाणीही पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा गरीब कुटुंबातील प्रामाणिक तरूणाला काय वाटत असेल, याचा विचार करायला हवा. श्रीमंतांचीच मुले नोकरीवर लागत असतील आणि प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करणारा गरीब तरूण जर अशा प्रकारच्या पेपरफुटीमुळे मागे राहत असेल, तर त्याच्यासारखे पाप नसल्याचेही ते यावेळी म्हणालेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande