
नांदेड, 24 मे (हिं.स.)। नांदेड शहराच्या मुख्य रस्त्यावरून
वाहतूक नियम मोडीत काढत गर्भ श्रीमंत समजणाऱ्या व थार मधून मिरविणाऱ्यांसोबतच फॅन्सी नंबर प्लेट लावून आपण इतरांपेक्षा काही वेगळे आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या टीमने चांगलेच वठणीवर आणले. शहरात अशा वाहनांची धरपकड मोहीम हाती घेऊन जवळपास आठ पेक्षा अधिक थार आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेक काळ्या फिल्म लावणाऱ्या गाड्य रस्त्यावरुन अचानक गायब झाल्या.
शहरामध्ये बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचा शहर वाहतूक शाखेकडून प्रयत्न सुरू आहे. शहरांच्या रस्त्याची काहीअंशी रुंदी वाढविल्याने वाहतूक कोंडीतून नांदेडकरांची सुटका झाली, मात्र वाहतूक नियम मोडीत काढत काही वाहनधारक आपल्या वाहनांच्या नंबर प्लेट, सायलेन्सर मध्ये किंवा ग्लासमध्ये बदल करून आपण काही वेगळे आहोत अशा अविर्भावात हे आपली वाहने चालवतात. शहरातून धावणाऱ्या चार चाकी वाहनांना काळ्या फिल्म लावल्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावल्याने एखादा गुन्हा करून जर हे वाहन भरधाव वेगात घटनास्थळावरून निघून गेले तर त्या वाहनाची ओळख पटविणे पोलिसांना अवघड होत आहे. वाहनांमध्ये बसलेले कोण आहेत? याची ओळख पटत नसल्याने अनेक गुन्हेगारसुद्धा अशा वाहनांचा वापर गुन्हे करण्यासाठी करतात हे मागील काही घटनांवरून उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी अचानक अशा वाहनांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. शहराच्या वेगवेगळ्या रस्त्यावर त्यांनी काळ्या फिल्म लावून आलेल्या थार, स्कार्पिओ व अन्य चारचाकी वाहनांची तपासणी केली. अशा वाहनांवरती जागेवरच काळ्या फिल्म काढण्यास भाग पाडले. उलट त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाही करण्यात आली. यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांनाही दंड आकारण्यात आला आणि त्यांच्या नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या असून त्यांना समज दिली आहे. यापुढेही ही मोहीम अशीच चालू राहणार असून काळ्या फिल्म किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या गाड्यांच्या काही भागांमध्ये बदल करून परिवहन कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा आपल्या वाहनाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis