
सोलापूर, 24 मे (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभरासह महाराष्ट्रात मतदार यादींच्या अचूकतेसाठी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे तसेच अपात्र नावे वगळणे यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारीएस. चोक्कलिंगमयांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारीएस. कार्तीकेयनयांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह विविधविभागांचेअधिकारी उपस्थित होते.मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनीबीएलओंनाघरभेटीदरम्याननागरिकांकडून गणना फॉर्मतत्काळभरून घेण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक कागदपत्रे त्याचवेळी स्वीकारावीत, तसेच नावातील विसंगती किंवा अविवाहित मतदारांच्या प्रकरणांमध्ये आवश्यक पुरावे तपासावेत, असे त्यांनी सांगितले. बीएलओ आणि सुपरवायझर यांना योग्य प्रशिक्षण देण्यावरही त्यांनी भर दिला.मतदार यादीत एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंद असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रत्येक घराचे क्रमांक निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. नव्याने 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची नोंदणी वेगाने करावी तसेच कमी मॅपिंग असलेल्या भागांमध्ये विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्ह्यात 11 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघ असून एकूण मतदारसंख्या 39 लाख 46 हजार 781 इतकी आहे. त्यामध्ये 20 लाख 10 हजार 948 पुरुष, 19 लाख 35 हजार 505 महिला आणि 328 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 3723 मतदान केंद्रे कार्यरत आहेत.जिल्ह्यातील 77 हजार 86 ब्लर फोटो व चुकीच्या नोंदींपैकी 72 हजार 648 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणे प्रक्रियेत आहेत. आतापर्यंत 32 लाख 83 हजार 811 मतदारांचे सखोल पुनरिक्षण पूर्ण झाले असून हे प्रमाण 83.20 टक्के आहे. ग्रामीण भागात 87.20 टक्के तर शहरी भागात 72.67 टक्के पुनरिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड