अमरावती - पाच जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
अमरावती, 24 मे (हिं.स.)। खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिवसा तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत तातडीने देण्यात यावी, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी
पाच जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा


अमरावती, 24 मे (हिं.स.)। खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिवसा तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत तातडीने देण्यात यावी, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या दोन मागण्यांसाठी शेतकरी व गुरुदेव भक्तांसह पाच जूनपासून तिवसा तहसील परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी दिला. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्चही निघाला नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. काही शेतकऱ्यांनी संतप्त होऊन उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याच्या घटनाही घडल्या होत्या. अशा गंभीर परिस्थितीतही विमा कंपन्यांकडून केवळ प्रति एकर २०० ते ३०० रुपयांचा अत्यल्प परतावा देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५६० शेतकऱ्यांनी सुमारे ८.९० कोटी रुपये प्रीमियम भरून पीक विमा घेतला होता. याशिवाय राज्य व केंद्र शासनाकडून प्रत्येकी २.१२ कोटी रुपयांचा हिस्सा जमा करण्यात आला. अशाप्रकारे एकूण १३.१४ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झाला. मात्र, नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील केवळ नऊ हजार ३४२ शेतकऱ्यांना सुमारे १.५० कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबतचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर, दीपक देशमुख, निवृत्ती मुकद्दम, विलास हांडे, राहुल लवणकर, बालकृष्ण शिरपूरकर, आशिष ढोरे, अंकुश बोके, संजय पुनसे, पंकज कळंबे, नामदेव तांबे, किशोर गोरडे, वीजेंद्र शिरपूरकर, प्रशांत पुनसे, रवी जवंजाळ, सुधीर लवणकर, भय्या पिंगळे, शंकर ढोक, अमोल डाखोरे यांच्यासह अनेक शेतकरी व गुरुदेव भक्त उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande