
रत्नागिरी, 25 मे (हिं.स.) । तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी मॅनेजर मुकुंद मुरलीधर पालांडे (रा. अलोरे) यांचा मृतदेह रविवारी, २४ मे रोजी सायंकाळी कोळकेवाडी धरणात आढळून आला.
मुकुंद पालांडे चिपळूण येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून ते बेपत्ता झाले होते. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी चिपळूण पोलीस निरीक्षकांना उद्देशून चारपानी पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. या पत्रात त्यांनी चौघांची नावे नमूद करत आपल्या आत्महत्येस त्यांना जबाबदार धरल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.पत्रामध्ये चिपळूण शहरातील वीरेश्वर तलाव परिसरात काही जणांनी मारहाण केल्याचा उल्लेख करण्यात आला असून, ओळखीच्या पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा कोळकेवाडी धरण परिसरात मुकुंद पालांडे यांची दुचाकी आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. शुक्रवारी आणि शनिवारी शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. रविवारी सकाळपासून शिरगाव पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि चिपळूणचे पोलीस निरीक्षक नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोटीने धरण परिसरात पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली.तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर रविवारी सायंकाळी मुकुंद पालांडे यांचा मृतदेह धरणात आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी