सुधागडमध्ये घरफोडी; चोरट्याने उडवला 1.30 लाखांचा ऐवज
रायगड, 25 मे (हिं.स.)। सुधागड तालुक्यातील पाली येथे बंद फ्लॅटचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्या
सुधागडमध्ये घरफोडी; चोरट्याने उडवला 1.30 लाखांचा ऐवज


रायगड, 25 मे (हिं.स.)। सुधागड तालुक्यातील पाली येथे बंद फ्लॅटचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आदोर प्लाझा, तिसरा मजला, फ्लॅट क्रमांक 305, पाली येथे राहणारे फिर्यादी काही कारणास्तव बाहेर गेले असताना त्यांच्या बंद फ्लॅटवर चोरट्याने डल्ला मारला. अज्ञात आरोपीने फ्लॅटच्या दरवाज्यावरील कडी-कोयंडा आणि लॉक कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने तोडून दरवाजा उघडला.

यानंतर आरोपीने फ्लॅटमध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. 73/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331(3), 331(4), 305(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande