
रत्नागिरी, 25 मे (हिं.स.) । वालोपे (ता. चिपळूण) येथे रविवारी रात्री भरधाव कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार वर्षीय गार्गी आग्रे हिचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेले तिचे वडील कुणाल काशिनाथ आग्रे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आग्रे यांच्या पत्नीवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. अपघातातील कंटेनर चालक आणि मालकाला तातडीने घटनास्थळी आणावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने महामार्गावरील वाहतूक चार तास विस्कळीत झाली होती.
या आंदोलनामुळे वालोपे परिसराच्या दोन्ही बाजूंना अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई आणि गोव्याच्या दिशेने जाणारे प्रवासी महामार्गावरच अडकून पडले. अखेर पोलिस प्रशासन, ग्रामस्थ आणि आग्रे कुटुंबीयांमध्ये झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला आणि रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या भीषण अपघातामुळे वालोपे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी