नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अधिक अनुदान द्या, चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
अमरावती, 25 मे (हिं.स.) - चांदूरबाजार शहरासह तालुक्यात नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवून ती एक लाख करावी, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे. वाढता शेतीखर्च, नैस
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अधिक अनुदान द्या चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी


अमरावती, 25 मे (हिं.स.) -

चांदूरबाजार शहरासह तालुक्यात नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवून ती एक लाख करावी, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे. वाढता शेतीखर्च, नैसर्गिक आपत्ती, पिकांना मिळणारे कमी दर आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून, वेळेवर कर्जफेड करूनही अनेक शेतकरी आर्थिक तणावाखाली जीवन जगत आहेत.विशेष म्हणजे या मतदार संघात सध्या सत्तेतील दोन आमदार आहेत.

चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी पीककर्जाच्या माध्यमातून शेती करतात, मात्र दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीतही अनेक शेतकरी कष्ट करून तसेच इतर मार्गांनी आर्थिक जुळवाजुळव करीत बँकांचे कर्ज वेळेत फेडतात. त्यामुळे अशा प्रामाणिक व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने एक लाखांवर आर्थिक मदत देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. विविध शेतकरी संघटना तसेच ग्रामस्तरावरील शेतकरी प्रतिनिधींनी शासनाकडे निवेदने सादर करण्यास सुरवात करणार असून, आगामी काळात ही मागणी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना आधार मिळेल

सध्या शासनाकडून काही योजनांतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जातो, मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अपुरी असल्याची भावना चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. खत, बियाणे, कीटकनाशके, वीजबिल, मजुरी तसेच मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनुदान वाढल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल, असे मत व्यक्त होत आहे.

सकारात्मक विचार करा

शेतकरी संघटनांच्या मते, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन दिल्यास इतर शेतकरीही वेळेत कर्जफेड करण्यास प्रेरित होतील. त्यामुळे बँकांची थकबाकी कमी होण्यास मदत होईल आणि आर्थिक शिस्तही निर्माण होईल. शासनाने केवळ कर्जमाफीपुरता विचार न करता प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सकारात्मक विचार करावा, अशी मागणी चांदूरबाजार तालुक्यातील प्रामाणिक नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande