अमरावतीत नेताजींनी लोकार्पण केलेली ऐतिहासिक शाळा मनपाकडून दुर्लक्षित
अमरावती, 25 मे (हिं.स.) अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ९८ वर्षे जुनी नेहरू मैदान परिसरातील ऐतिहासिक वास्तू महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत दुरवस्थेत पोहचली आहे. एकेकाळी राष्ट्रगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते १
नेहरू मैदान मधील ऐतिहासिक शाळा मनपा कडून दुर्लक्षित  नेताजींनी केले होते शाळेचे लोकार्पण


अमरावती, 25 मे (हिं.स.)

अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ९८ वर्षे जुनी नेहरू मैदान परिसरातील ऐतिहासिक वास्तू महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत दुरवस्थेत पोहचली आहे. एकेकाळी राष्ट्रगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते १९२८ मध्ये लोकार्पण झालेल्या आणि अनेक मान्यवरांचे प्राथमिक शिक्षण केंद्र राहिलेल्या या वास्तूची आज कमालीची पडझड झाली असून, ही ऐतिहासिक इमारत अक्षरशःअश्रू ढाळत आहे.

या ऐतिहासिक वारशाच्या अत्यंत भयंकर दुरवस्थेकडे महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक दिनेश बुब आणि अनिल अग्रवाल यांनी प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधले आहे. महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार आक्षेप घेत, या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपल्या विकास निधीतून आणि सार्वजनिक निधीच्या माध्यमातून या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची तयारी दर्शवली आहे. या जागेची पाहणी केली असता तिथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, सर्वसामान्य नागरिकांना तिथे उभे राहणेही कठीण झाले आहे. या ऐतिहासिक इमारतीतून अनेक नामवंत व्यक्तींनी प्राथमिक शिक्षण घेतले असून शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहासात या वास्तूचे महत्त्वाचे स्थान आहे. मात्र सध्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे. आवश्यक दुरुस्ती व संवर्धनाअभावी वास्तूचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.ज्या वास्तूचे जतन करून तिचे सौंदर्य टिकवणे महापालिकेचे कर्तव्य होते, तिथे आज कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, ही जुनी इमारत केवळ जीर्ण आणि खिळखिळी झाली नसून पूर्णपणे कचराघर बनली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत महापालिकेची मराठी आणि हिंदी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक शाळा या इमारतीमध्ये अत्यंत उत्साहात सुरू होती. बालकांच्या किलबिलाटाने आणि अभ्यासाने गजबजणारे हे वर्ग आज उजाड झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या लाकडी छताला आग लागण्याची दुर्घटना घडली होती, मात्र तरीही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासकीय राजवटीत आणि त्यानंतरच्या काळातही याकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला. आजही तिथे वर्गांमध्ये पडलेले फलक आणि मुलांनी बनवलेले अभ्यास तक्ते विखुरलेल्या अवस्थेत प्रशासनाच्या नाकर्तेपणाची साक्ष देत आहेत. पुढील दोन वर्षांत नानासाहेब गोखले स्मारक ही इमारत शतकोत्तर वर्षात पदार्पण करणार आहे. काळानुसार या वास्तूची दुरुस्ती करून तिला अधिक सुंदर बनवणे गरजेचे होते, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने साधी पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आज खिडक्या, दरवाजे तुटून गेले असून इमारतीमध्ये भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. भरदिवसा तिथे गैरप्रवृत्तीच्या लोकांचा राबता असतो, तर रात्रीच्या वेळी अनैतिक कारभार आटोपणाऱ्या लोकांनी या कक्षांचा ताबा घेतला आहे. शिवसेना नेते दिनेश बुब यांनी या सर्व प्रकाराला महापालिकेची अक्षम्य घोडचूक म्हटले असून, अमरावतीची ओळख असलेली ही वास्तू रामभरोसे सोडल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते अनिल अग्रवाल यांनीही शहराचे वैभव असलेल्या या स्मारकाची काळजी घेणे सर्वांचेच कर्तव्य असल्याचे सांगत, स्वतःच्या घराप्रमाणे या वास्तूची देखभाल व्हायला हवी होती अशी भावना व्यक्त केली. या ऐतिहासिक वारशाला पुनरुज्जीवित करण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.

ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व धोक्यात-अमरावतीच्या मध्यभागातील ऐतिहासिक नानासाहेब गोखले स्मारक वास्तू आज महापालिकेच्या उदासीनतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पावन स्पशनि पुनीत झालेल्या या वास्तूची झालेली दुरवस्था पाहून नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असून लोकप्रतिनिधींनी आता ही वास्तू पुनर्जीवित करण्याची तयारी दर्शवली आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande