
रायगड, 25 मे (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील आंदोशी येथे अवैध माती उत्खनन प्रकरणी माहिती देण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आंदोशी येथील राजेंद्र शिवराम चेरकर यांच्या मालकीच्या शेतामध्ये महसूल विभागाची कोणतीही परवानगी अथवा रॉयल्टी न घेता अवैध माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत शासनाच्या दंडात्मक कारवाईची प्रक्रिया आणि दंड रकमेबाबत माहिती देण्यासाठी संबंधित अधिकारी व साक्षीदार घटनास्थळी गेले होते.
दरम्यान, सकाळी सुमारे 11.45 वाजण्याच्या सुमारास आंदोशी येथील आरोपी तेथे आला. फिर्यादी यांनी यापूर्वी रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात दाखल गुन्ह्यात साक्ष दिल्यामुळे त्याला न्यायालयाकडून शिक्षा झाली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत “तुझ्यामुळे मला कोर्टात सजा झाली” असे म्हणत दमदाटी केली.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या टी-शर्टची गळपट्टी पकडून दोन्ही गालांवर चार ते पाच वेळा थपडा मारल्या व धक्काबुक्की केली. तसेच “पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर संध्याकाळपर्यंत तुझा मर्डर करीन” अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 62/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ गावडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)