
रत्नागिरी, 25 मे (हिं.स.) : समाजातील नवीन पिढी वाचन प्रक्रियेत येणे अत्यंत गरजेचे असून, सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी वाचनालयांची निर्मिती होणे काळाची गरज आहे. वाचनालयातूनच तरुण पिढीच्या भविष्याचा मार्ग तयार होतो, असे प्रतिपादन कृषीभूषण व साहित्यिक डॉ. तानाजी चोरगे यांनी केले.
चिपळूण शहरातील खेंड येथील स्प्रिंग हॉस्पिटलमध्ये विभा अरविंद वाचनालयाचे उद्घाटन नगरसेवक अंकुश आवळे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चोरगे बोलत होते. ते म्हणाले की, कितीही वाचनालये सुरू झाली तरी ती कमीच पडणार आहेत. घराघरात वाचन संस्कृती रुजणे आवश्यक आहे. वाचन हे मेंदूचे अन्न आहे. त्यातून विचार समृद्ध होतात आणि व्यक्तिमत्त्व घडते, असे ते म्हणाले. मोबाइलच्या युगात वाचन संस्कृती हरवत चालल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी जुन्या पिढीचे विचार आणि कार्य समजून घेण्यासाठी चरित्र वाचन आवश्यक असल्याचे सांगितले. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी भाष्य करत गुणांची खैरात म्हणजे गुणवत्ता नव्हे, असा टोला लगावला.
यावेळी आमदार शेखर निकम यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, नगरसेवक अंकुश आवळे, नगरसेविका नीलिमा जाधव, नगरसेविका राणी महाडिक, माजी आमदार रमेशभाई कदम, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेवक निहार कोवळे, प्रसाद डमढेरे, प्रसाद रिसबूड, डॉ. यतीन जाधव, डॉ. वैशाली जाधव, संतोष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचनालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांनी डॉ. यतीन जाधव व त्यांच्या परिवाराचे विशेष कौतुक केले. त्यांनी वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून देत आर्थिक योगदानही केले आहे. त्यामुळे हे वाचनालय आप्पांच्या कार्याचे प्रतीक ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.प्रकाश काणे यांनी वाचनालय निर्मितीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जोशी यांनी केले, तर विजय कदम यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी