
रत्नागिरी, 25 मे (हिं.स.) । येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी बसेसमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने शहरात नव्याने सुरक्षित बसथांबे निश्चित केले आहेत. परिवहन विभाग, पोलीस व खासगी बस वाहतूकदार यांनी संयुक्त सर्वेक्षण करून हे बसथांबे निश्चित केले आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी परिवहन विभाग, पोलीस विभाग व खालगी प्रवासी बस वाहतूकदार यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नवीन थांब्यांबाबत माहिती देण्यात आली. सुटीच्या हंगामामुळे रत्नागिरी ते मुंबई, पुणे प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. याचसोबत शहरामध्ये रस्त्यांची कामेही सुरू आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय होईल अशा प्रकारे नियोजन करून संयुक्त सर्वेक्षणातून नव्याने थांबे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
नव्याने प्रस्तावित केलेल्या थांब्यांमध्ये रेल्वेस्टेशन कॉर्नर स्टॉप आणि कुवारबाव येथील सध्याचा थांबा आता इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर (रेल्वे स्टेशन कॉर्नरजवळ) निश्चित केला आहे. सावंत हॉटेल (टीआरपी) येथील थांबा सुझुकी विघ्नेश्वरा शोरूमसमोर स्थलांतरित केला आहे. साळवी स्टॉप येथील थांब्यांपैकी मारुती सुझुकी नेक्सा शोरूमसमोर आणि चिरायू हॉस्पिटलसमोर शेडजवळ असतील. शिवाजीनगर येथील थांबा बसस्टॉप आणि एचडीएफसी बँकेसमोर तसेच लेन्सकार्ट शोरूमजवळ निश्चित केला आहे. मारुती मंदिर येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. विवेक हॉटेलसमोर, शिर्के उद्यानाजवळ आणि आरडीसीसमोर, बांधकाम भवनजवळ (फक्त शनिवारी) येथील थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रहाटघर बस स्टँड येथील थांबा बस स्टँडच्या वरील बाजूस निश्चित केला आहे.
या बैठकीवेळी मोटर वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, सुदेश पाटील, केतन पाटील, गजानन कोळी, वाहतूक शाखेचे शिवराय घाग, राजेंद्र लक्ष्मण देवरूखकर, महेश साळवी, हरिश्चंद्र चव्हाण, ऋषिकेश कामत, संदेश निकम, अविनाश खेडेकर, दत्तात्रय कोंडणकर, रूपेश शिंदे, विशाल कदम, यश कांबळे, सागर लिंगायत, अमेय साळवी आदी विविध ट्रॅव्हल्सचे संचालक उपस्थित होते.
बैठकीत बस वाहतूकदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ निश्चित थांब्यावरच खासगी बस थांबवावी, अधेमधे बस थांबवता येणार नाही. एकाच वेळी सर्व वाहतूकदारांनी बसेस न सोडता टप्प्याटप्प्याने सोडाव्यात. बसेस थांबविताना वाहतुकीचा अंदाज घेऊन योग्य प्रकारे खबरदारी घेऊनच बस थांबवाव्यात, यासाठी बसचालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या वैधतेची तपासणी करावी, तसेच बसमध्ये आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी, अशी सक्त सूचना या बैठकीत देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी