धोकादायक व रोगट मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : प्रभुराज प्रतिष्ठान
लातूर, 25 मे (हिं.स.)। प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने लातूर महानगरपालिका व नाना-नानी पार्क परिसरात गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कुत्र्यांचे मुखवटे परिधान करून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे प्
भटके कुत्रे बंदोबस्त


लातूर, 25 मे (हिं.स.)।

प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने लातूर महानगरपालिका व नाना-नानी पार्क परिसरात गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कुत्र्यांचे मुखवटे परिधान करून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

लातूर शहरातील विविध भाग, गल्ली-बोळ तसेच मुख्य रस्त्यांवर ५० ते १०० च्या संख्येने मोकाट कुत्र्यांचे कळप फिरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नागरिकांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून जावे लागत असून लहान मुलांना खेळणेही कठीण झाले आहे. अनेक बालकांना कुत्र्यांच्या चाव्यामुळे जखमी व्हावे लागल्याचे, तर काहींना प्राण गमवावे लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सकाळी व रात्री फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनचालकांचा पाठलाग केल्याने अपघाताच्या घटनाही वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. विशेषतः क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या समस्येचा मोठा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले.

मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अँड. अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. “आता तरी करा बंदोबस्त”, “हद्दपार करून दाखवा” अशा घोषणांद्वारे प्रशासनाला आवाहन करण्यात आले.

यावेळी अँड. अजय कलशेट्टी, अँड. शिरीष दहिवाल, अँड. सचिन बावगे, सूर्यप्रकाश धूत, शिरीष माळी, डॉ. संजय जमादाडे, डॉ. राजकुमार तोष्णीवाल आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande