बांगलादेशमध्ये लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने अपघात; १५ जणांचा मृत्यू, १० जखमी
ढाका , 25 मे (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये सोमवारी पहाटे एका प्रमुख महामार्गावर लोखंडी सळ्या वाहून नेणारा ट्रक उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १० जण जखमी झाले. ईद-उल-अजहाच्या १० दिवसांच्या सुट्ट्यांसाठी लोक आपल्या मूळ गावी जात असताना हा भीषण अप
बांगलादेशमध्ये लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने अपघात; १५ जणांचा मृत्यू, १० जखमी


ढाका , 25 मे (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये सोमवारी पहाटे एका प्रमुख महामार्गावर लोखंडी सळ्या वाहून नेणारा ट्रक उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १० जण जखमी झाले. ईद-उल-अजहाच्या १० दिवसांच्या सुट्ट्यांसाठी लोक आपल्या मूळ गावी जात असताना हा भीषण अपघात घडला.

स्थानिक अग्निशमन केंद्राचे प्रभारी अताउर रहमान यांनी सांगितले की, हा अपघात जमुना पुलाच्या पूर्वेकडील भागात झाला. हा पूल बांग्लादेशच्या उत्तर-पश्चिम भागाला मध्य भागाशी जोडतो. त्यांनी सांगितले की, जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रकमध्ये लोखंडी सळ्यांसह काही प्रवासीही प्रवास करत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तांगाइल जिल्ह्यातील कलिहाटी उपजिल्ह्यात ट्रक पलटी झाला.

तांगाइलच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक फौजिया हबीब खान यांनी सांगितले की, हा ट्रक चट्टोग्राम या दक्षिण-पूर्व बंदर शहरातून उत्तर-पश्चिम भागाकडे जात होता. ईदच्या गर्दीमुळे प्रवाशांनी वाटेत वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रकमध्ये प्रवेश केला असण्याची शक्यता आहे.

बांग्लादेशमध्ये सोमवारपासून ईद-उल-अजहाच्या १० दिवसांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी जात असून बस, रेल्वे आणि बोटी प्रवाशांनी खचाखच भरल्या आहेत. कमी खर्च आणि नियमित प्रवासी वाहनांमध्ये तिकीट न मिळाल्याने गरीब नागरिक अनेकदा ट्रकमधून प्रवास करतात.

पोलिसांनी सांगितले की, मृत झालेल्या १५ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही आणि त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांग्लादेशमध्ये जगातील सर्वाधिक रस्ते अपघात मृत्यूदरांपैकी एक आहे. बेदरकार वाहन चालवणे, अयोग्य वाहने आणि खराब रस्त्यांची अवस्था ही अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) २०२१ च्या अंदाजानुसार, रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी सुमारे ३२ हजार बांग्लादेशी नागरिकांचा मृत्यू होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande