
कीव, 25 मे (हिं.स.)। रशियाने रविवारी युक्रेनवर भीषण हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यालयाचेही नुकसान झाले. यानंतर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी युद्धविरामाचे आवाहन केले.
टेड्रोस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, “काल रात्री कीवमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात युक्रेनमधील डब्ल्यूएचओचे कार्यालय नुकसानग्रस्त झाले.” नुकसान झालेल्या इमारतीचे फोटो शेअर करत त्यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओ कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडक्या फुटल्या आहेत. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.
मानवी आणि नागरी पायाभूत सुविधांना निर्माण झालेल्या धोक्याकडे लक्ष वेधताना टेड्रोस म्हणाले की, या इमारतीत डब्ल्यूएचओव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांनी लिहिले, “आरोग्यसेवा आणि नागरिकांवरील हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत.” यापुढे सर्व पक्षांनी युद्धविरामावर सहमती दर्शवावी, असे आवाहन करत त्यांनी म्हटले, “आम्ही पुन्हा एकदा युद्धविरामाचे आवाहन करत आहोत. शांतताच सर्वोत्तम औषध आहे.”
टेड्रोस यांनी कीवमधील नागरी पायाभूत सुविधांवर रात्रभर झालेल्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यू आणि जखमींबाबतही चिंता व्यक्त केली. रविवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर रात्रभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये निवासी भाग, एक शाळा आणि व्यावसायिक इमारतींना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत किमान चार जणांचा मृत्यू झाला.
मॉस्कोकडून रशियाच्या ताब्यातील भागांवर युक्रेनने केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला करण्यात आला. रशियन अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, त्या हल्ल्यांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode