
पुणे, 25 मे (हिं.स.)। ‘फोडा आणि झोडा’ ही ब्रिटिशांची नीती समाजामध्ये खोलवर रुजली असून, त्यातून प्रत्येक गोष्टीकडे जातीय दृष्टिकोनातून पाहण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाही अशाच पद्धतीने वापर करण्यात आला असून, आपण त्यांच्या विचारांचे गुन्हेगार आहोत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सदानंद माेरे यांनी व्यक्त केले. “अजूनही आपण जातीची धुणी धुत आहोत,” असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचे शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचे मत मांडले.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने आयोजित ‘मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन - वाटा आणि वळणे’ या विषयावरील अ. रा. कुलकर्णी स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंडळाचे सरचिटणीस पांडुरंग बलकवडे, कोषाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतिहास विभागाच्या माजी प्रमुख डॉ. रेखा रानडे, डॉ. सुमित्रा कुलकर्णी आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी उपस्थित होत्या.
सदानंद माेरे म्हणाले, “व्यापारासाठी भारतात आलेल्या इस्ट इंडिया कपंनीने मराठ्यांचा पराभव करून भारतावर सत्ता मिळवली. मात्र, काही ब्रिटिश इतिहासकारांनी सत्ता मोगलांकडून घेतल्याचा प्रचार केला. तर काही इतिहासकारांनी मराठ्यांना दुय्यम ठरवत रजपूतांना मोठे करण्याचा प्रयत्न केला.”
इतिहास लेखनातील जातीय रचनेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे गुणगान पोवाडे, संस्कृत चरित्रे आणि बखरींच्या माध्यमातून झाले. संस्कृतमध्ये लेखन करणारे ब्राह्मण, पोवाडे लिहिणारे गोंधळी आणि बखरी लिहिणारे बहुतांश कायस्थ प्रभू होते. त्यामुळे त्या काळातील जातीव्यवस्थेचे प्रतिबिंब इतिहास लेखनातही दिसून येते.“छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रीय नायक म्हणून पहिल्यांदा मांडण्याचे काम बाल गंगाधर टिळक यांनी केले,” असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु