अमरावती - सिटी बसला एक महिन्याचे जीवदान; कंत्राटदार अटींवर देणार सेवा
अमरावती, 26 मे (हिं.स.)। महापालिकेच्या आपली बससेवेस महिनाभऱ्याचे जीवदान मिळाले आहे. कंत्राटाची मुदत संपल्याने उद्यापासून शहर बसची चाके थांबणार होती, ती आता एक महिना आणखी चालणार आहेत. महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत कंत्राटदारासोबत झालेल्या बैठकीत
सिटी बसला एक महिन्याचे जीवदान कंत्राटदार अटींवर देणार सेवा, प्रवाशांना तात्पुरता दिलासा


अमरावती, 26 मे (हिं.स.)।

महापालिकेच्या आपली बससेवेस महिनाभऱ्याचे जीवदान मिळाले आहे. कंत्राटाची मुदत संपल्याने उद्यापासून शहर बसची चाके थांबणार होती, ती आता एक महिना आणखी चालणार आहेत. महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत कंत्राटदारासोबत झालेल्या बैठकीत अटींवर आधारित महिनाभर सेवा सुरू ठेवण्यावर सहमती झाली. यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

अमरावती शहर बससेवा मात्र मृत्यूपंथाला लागली आहे. शहर बससेवेचा करार संपुष्टात आल्याने कंत्राटदार कंपनीने बससेवा सुरू ठेवण्यास नकार दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यान, आज महापौर, महापालिका आयुक्त आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंत्राटदारासोबत चर्चा करण्यात आली, त्यातून महिनाभऱ्यासाठी ही बससेवा सुरू ठेवण्याचा तूर्तास तोडगा निघाला आहे, पण त्यानंतर काय?, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या २० वर्षांत चार कंत्राटदार बदलण्यात आले असले तरी सेवा सुरू होती. महापालिकेस या माध्यमातून अल्प उत्पन्न मिळत असले तरी ‘लोककल्याणकारी सेवा’, या शीर्षाखाली सेवा अविरत होती. मात्र ही सेवा खंडित होण्याची स्थिती निर्माण झाली होती. सद्यस्थितीत बारा बसेस शहरातील सहा मार्गावर धावत असून दररोज बारा हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. विद्यमान स्थितीत साहू टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, या कंत्राटदार कंपनीचा कंत्राट आज २५ मे २०२६ रोजी संपुष्टात आला आहे. विद्यमान कंत्राटदारास मुदतवाढ देऊन बससेवा सुरू ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता, मात्र कंत्राटदाराने सेवा सुरू ठेवण्यास आपण असमर्थ असल्याचे महापालिकेस कळविले होते. ही सेवा चालविताना दरमहा सहा ते सात लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे होते. दरम्यान, महापौर, महापालिका आयुक्त, सत्तारूढ पक्षनेत्यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक पार पडली. कंत्राटदाराने काही मागण्या समोर ठेवल्या. त्यात तोट्याचे कारण समोर केले आहे. बसगाड्यांचा विमा काढण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने त्याची भरपाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. पण, सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने महापालिकेला निर्णय घेता येत नाही, असे कारण समोर करण्यात आले. अखेर चर्चेनंतर येत्या २५ जूनपर्यंत शहर बससेवा सुरू ठेवण्यास कंत्राटदाराने तयारी दर्शविल्याने तूर्तास संकट टळले आहे. अमरावतीत २००६ मध्ये कंत्राटी तत्त्वावर शहर बससेवा सुरू झाली. त्याआधी शहरात एसटी महामंडळातर्फे बससेवा पुरविण्यात येत होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही बससेवा शहरातील कष्टकरी, श्रमजीवी वर्गासह विद्यार्थी, नोकरदार व सामान्य नागरिकांसाठी मोलाची ठरली आहे. बैठकीला मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, महापौर श्रीचंद्र तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, परिवहन अधिकारी राजेश अडोकार व कंत्राटदार महेश साहू उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande