
पुणे, 26 मे (हिं.स.) : मुंढवा येथील सुमारे ४० एकर शासकीय जमिनीवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवण्याचा कथित कट आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाला आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून शीतल किशनचंद तेजवाणी तसेच अमेडिया एंटरप्रायजेसचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८० पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासादरम्यान दोघांविरुद्ध सबळ पुरावे आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मात्र, गंभीर स्वरूपाचा गुन्हा समोर येऊनही दिग्विजय पाटील यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे पुणे आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८८ मधील ४० एकर जमीन मूळतः मुंबई सरकारच्या मालकीची असून, त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर स्पष्टपणे करण्यात आली आहे. १९५९ पासून ही जमीन केंद्र सरकारच्या ‘बॉटेनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ (BSI) संस्थेला नाममात्र भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. पुढे १९८८ ते २०३८ या कालावधीसाठी ती अधिकृतपणे BSI च्या ताब्यात देण्यात आली.
तपासानुसार, या जमिनीचे कथित बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून शीतल तेजवाणी यांनी ती जमीन अमेडिया एंटरप्रायजेसला विकल्याचा आरोप आहे. तब्बल १८०० कोटी रुपयांचा बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत व्यवहार केल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, दस्त नोंदणी प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क टाळून सरकारची फसवणूक करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तपासावर संशय
या प्रकरणातील सुरुवातीच्या १८८६ पानी आरोपपत्रात दिग्विजय पाटील यांचे नाव नसल्याने प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पुढील तपासात पुरावे समोर आल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्रात त्यांचा समावेश करण्यात आला.
दरम्यान, गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांकडूनच काही बाबींमध्ये “गैरसमज” झाल्याचे सांगितले जात असल्याने तपास प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.
शीतल तेजवाणी परदेशात गेल्याची माहिती समोर आली असून, दिग्विजय पाटील यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अटकेची ठोस कारवाई न झाल्याने या प्रकरणाकडे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरही लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु