‘एसआयआर’ प्रक्रियेवर ठाकरे गट सतर्क; आदित्य ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश
मुंबई, 26 मे (हिं.स.)। देशभरात निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘एसआयआर’ अर्थात विशेष संस्थात्मक पुनरावलोकन आणि मतदार यादी पडताळणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता आक्रमक आणि सावध भूमिका घेतली आहे. काही रा
SIR Process Aditya Thackeray Alert Regarding


मुंबई, 26 मे (हिं.स.)। देशभरात निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘एसआयआर’ अर्थात विशेष संस्थात्मक पुनरावलोकन आणि मतदार यादी पडताळणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता आक्रमक आणि सावध भूमिका घेतली आहे. काही राज्यांमध्ये या प्रक्रियेदरम्यान अनेक मतदारांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराचा फटका विरोधी पक्षांना बसल्याचा दावा देखील करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू होताच संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे.

सोमवारी रात्री दादर येथील शिवसेना भवनात पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील माजी नगरसेवक, विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ‘एसआयआर’ प्रक्रियेकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याच्या सूचना यावेळी आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. “या प्रक्रियेबाबत कोणीही गाफील राहू नका. अन्यथा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

बैठकीत बोलताना आदित्य ठाकरे यांनी बिहार आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा उल्लेख केला. त्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी अत्यंत कमी वेळ देण्यात आला होता, मात्र महाराष्ट्रात सध्या पुरेसा वेळ उपलब्ध असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने आणि दक्षतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी स्थानिक पातळीवर ‘एसआयआर’ प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने प्रत्यक्ष लक्ष घालून मतदार यादींची तपासणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

दरम्यान, ठाकरे गटाने रणनीतीचा भाग म्हणून १ जून ते १० जून या कालावधीत ‘बीएलए’ अर्थात बूथ स्तर प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रत्येक मतदार यादीसाठी ‘बीएलए’ नेमणे बंधनकारक असल्याचे सांगत अधिकाधिक प्रतिनिधींची नोंदणी करण्याच्या सूचना मुंबईतील सर्व शाखाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये संभाव्य छेडछाड टाळण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराचे नाव सुरक्षित राहावे यासाठी ठाकरे गटाने आतापासूनच मैदानात उतरत संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande