सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स -निफ्टी पुन्हा तेजीत
नवी दिल्ली, 26 मे (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आजच्या व्यवहाराची सुरुवात कमकुवत वातावरणात झाली असली तरी काही वेळातच बाजाराने सावरत पुन्हा तेजीचा मार्ग पकडला. सुरुवातीला विक्रीचा दबाव दिसून आला, मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी सुरू
Stock Market Early Trade


नवी दिल्ली, 26 मे (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आजच्या व्यवहाराची सुरुवात कमकुवत वातावरणात झाली असली तरी काही वेळातच बाजाराने सावरत पुन्हा तेजीचा मार्ग पकडला. सुरुवातीला विक्रीचा दबाव दिसून आला, मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी सुरू केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात प्रवेश केला. सकाळच्या सत्रात नफा वसुलीमुळे बाजारात पुन्हा काही प्रमाणात घसरण झाली, पण त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

व्यवहाराच्या पहिल्या तासाअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.०७ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ०.१३ टक्क्यांच्या मजबुतीसह पुढे सरकत होता. सकाळी १०:१५ वाजेपर्यंत सेन्सेक्स ५५.६९ अंकांनी वाढून ७६,५४४.६५ या स्तरावर पोहोचला होता. दुसरीकडे निफ्टी ३१.९५ अंकांच्या वाढीसह २४,०६३.६५ या स्तरावर व्यवहार करत होता.

आज सेन्सेक्सची सुरुवात २६४.८२ अंकांच्या घसरणीसह ७६,२२४.१४ या स्तरावर झाली होती. बाजार उघडल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत खरेदी वाढल्याने सेन्सेक्सने उसळी घेत ७६,६१६.०२ हा उच्चांक गाठला. त्यानंतर नफा वसुलीमुळे निर्देशांकात थोडी घसरण झाली, परंतु सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा खरेदी वाढल्याने बाजाराने तेजी कायम ठेवली.

निफ्टीची सुरुवातही २७.६० अंकांच्या घसरणीसह २४,००४.१० या स्तरावर झाली होती. मात्र सुरुवातीच्या खरेदीनंतर निफ्टीने २४,०७७.२० या स्तरापर्यंत झेप घेतली. त्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला, पण पुन्हा खरेदी वाढल्याने निर्देशांक मजबूत स्थितीत राहिला.

आजच्या व्यवहारात टीएमपीव्ही, कोल इंडिया, एटरनल, अदानी एंटरप्रायझेस आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. या कंपन्यांचे शेअर्स २.६३ टक्क्यांपासून ०.७३ टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे कोटक महिंद्रा, सन फार्मास्युटिकल्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, मॅक्स हेल्थकेअर आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

एकूण २,९९६ शेअर्समध्ये व्यवहार सुरू होता. त्यापैकी २,०५४ शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते, तर ९४२ शेअर्स घसरणीत होते. सेन्सेक्समधील ३० पैकी १६ शेअर्स वाढीसह तर १४ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. निफ्टीमधील ५० पैकी २८ शेअर्स हिरव्या चिन्हात तर २२ शेअर्स लाल चिन्हात होते.

याआधी सोमवारी बाजारात मोठी तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स १,०७३.६१ अंकांच्या वाढीसह ७६,४८८.९६ या स्तरावर बंद झाला होता, तर निफ्टीने ३१२.४० अंकांची उसळी घेत २४,०३१.७० या स्तरावर दिवसअखेर व्यवहार संपवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande