अमरावतीत महागाईचा भडका; भाजीपाला, धान्य आणि तेलाचे दर वाढले
अमरावती, 26 मे (हिं.स.)। जिल्ह्यासह ग्रामीण भागात महागाईचा फटका अधिकच जाणवू लागला आहे. इंधन दरवाढ, वाहतूक खर्चवाढ आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या असमतोलामुळे भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत सर्वच वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. खाद्यतेलांचे दरही तेजी
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत सारेच महाग


अमरावती, 26 मे (हिं.स.)। जिल्ह्यासह ग्रामीण भागात महागाईचा फटका अधिकच जाणवू लागला आहे. इंधन दरवाढ, वाहतूक खर्चवाढ आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या असमतोलामुळे भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत सर्वच वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. खाद्यतेलांचे दरही तेजीत असून सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. आठवडी बाजारात मेथी व कोथिंबिरीचे भाव भडकले असून प्रतिजुडी २० ते ४० रुपये आकारले जात आहेत. इतर पालेभाज्या दहा रुपयांवर स्थिर आहेत. फळभाज्यांमध्ये प्रतिकिलो पाच ते १० रुपये वाढ दिसून येत आहे. कांद्याची पात १५-२० रुपये, पालक, करडई, चाकवत १० रुपये प्रतिजुडी, वांगी ५०-६० रुपये, दोडका ७०-८० रुपये, गवार ६० रुपये, कारली ५०-६० रुपये, टोमॅटो ३०-४० रुपये, कांदा १५-३० रुपये, बटाटा २०-३० रुपये, लसूण १००-१८० रुपये, कोबी १०-२० रुपये, तर फुलकोबी १५-३० रुपये प्रतिकिलो आहे. त्याचप्रमाणे फुले, धान्य, डाळी व तेलाच्या दरातही तेजी आली आहे. त्यामुळे ग्रामीण ग्राहकांवर महागाईचा मोठा ताण दिसून येत आहे.

इंधन दरवाढीचा आणखी झटका इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेतील महागाई आणखी वाढली आहे. पेट्रोलच्या किंमतीमध्ये ८७ पैशांची आणि डिझेलमध्ये ९१ पैशांची वाढ नोंदली गेली असून, १० दिवसांत ही तिसरी दरवाढ आहे. १५ मे रोजी तीन रुपये आणि १९ मे रोजी ९० पैसे, अशी वाढ झाली होती. त्यामुळे एकूण जवळपास पाच रुपये प्रति लिटरने इंधन महाग झाले आहे. इंधनाचे वाढते दर वाहतूकखर्च वाढवून थेट भाजीपाल्यापासून धान्यापर्यंतच्या दरांवर परिणाम करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande