
अमरावती, 26 मे (हिं.स.)।
मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी इच्छूक असलेल्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. वन विभागाने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील सेमाडोह, चिखलदरा, हरिसाल, शहानूर, नरनाळा आणि इतर सर्व सफारी गेट १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साडेतीन महिने पर्यटकांना जंगलात सफारीचा आनंद घेऊ शकता येणार नाही.साधारणपणे १५ जूनपासून पावसाळा संपेपर्यंत राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात येते. १ ऑक्टोबरपासून पर्यटनाला पुन्हा सुरूवात होते. येत्या १५ जूनपासून वन विभागाने मेळघाटातील सफारीचे बुकिग बंद केले आहे. संकेतस्थळावर त्याची माहिती मिळते. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळा संपेपर्यंत जंगल सफारीसाठी वाट बघावी लागणार आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होतात. जंगलात वाहने अडकून पडतात. याशिवायवन्यप्राण्यांचाप्रजननकालावधीलक्षात घेऊन वन्यप्राण्यांच्या हालचाली अबाधित ठेवण्यासाठी जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले.
कच्च्या रस्त्यांमुळे मर्यादापावसाळ्यात वनक्षेत्रातील कच्च्या रस्त्यांवर परिस्थिती अधिकच बिकट होत जाते. वन्यजीव आणि पर्यटकांच्या संरक्षणाचा विचार करून, सफारी उपक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसात जंगलात वाहने चालवणे धोकादायक बनते. अनेक मार्ग निसरडे होतात, नाल्यांमध्ये पाणी साचते आणि दृश्यमानता कमी होते.याच कारणामुळे, दरवर्षी पावसाळ्यात गाभा क्षेत्रातील सफारी बंद ठेवल्या जातात. जर पाऊस सामान्य असेल, तर काहीबफरझोनकिवामर्यादित मार्ग पर्यटकांसाठी खुले राहू शकतात. सतत मुसळधार पाऊस पडल्यास, या भागांतील सफारीदेखील बंद केल्या जाऊ शकतात. वन विभागाने पर्यटकांना सफारी बुक करण्यापूर्वी संबंधित अभयारण्यातून अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.विविध जैवविविधतेने परिपूर्ण अशा मेळघाटच्या जंगलात विविध प्राण्यांसह दुर्मिळ झाडे, दऱ्या-खोऱ्यांचा संगम आहे. एकाच ठिकाणी पर्यटकांना असा नैसर्गिक अनुभव देणाऱ्या मेळघाट जंगलात पर्यटकांसाठी जंगल सफारीची सोयही आहे. मेळघाट जंगलात वाघांसह अस्वल, सांबर, रानगवायांसारखे विविध प्रकारचे प्राणी पर्यटकांना अनेकदा दर्शन देतात.सध्या शंभरावर वाघांची संख्या या जंगलात आहे. मेळघाटाचे जंगल विस्तीर्ण आहे. वनविभागाकडून जंगल सफारी मार्गावर दर दोन ते तीनकिमी अंतरावर प्राण्यांसाठी पाणवठ्याची सोय केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी प्राणी पाणवठ्यांवर येतात. त्या कारणाने उन्हाळ्यात जंगल सफारी दरम्यान प्राणी दिसण्याची दाट शक्यता असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी