नाशिकच्या लहवित परिसरात रेल्वे रुळांवर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न
देवळाली कॅम्प, 27 मे (हिं.स.)। लहवित रेल्वेस्थानकाजवळील गराडी रेल्वे पूल ते साउथ एअरफोर्स, देवळाली दरम्यान मोहमाळ बाजूने जाणाऱ्या डाउन रेल्वे मार्गावर अज्ञात समाजकंटकांकडून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १४ म
नाशिकच्या लहवित परिसरात रेल्वे रुळांवर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न


देवळाली कॅम्प, 27 मे (हिं.स.)। लहवित रेल्वेस्थानकाजवळील गराडी रेल्वे पूल ते साउथ एअरफोर्स, देवळाली दरम्यान मोहमाळ बाजूने जाणाऱ्या डाउन रेल्वे मार्गावर अज्ञात समाजकंटकांकडून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १४ मेपासून सायंकाळच्या सुमारास राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेत रेल्वे रुळांवर सिमेंटचे गट्टू / दगड ठेवले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वेगवान आणि महत्त्वाच्या गाड्यांच्या मार्गावर जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून संभाव्य घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे दरम्यान हा प्रकार घडत असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. लोहशिंगवे, लहवित तसेच आसपासच्या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अज्ञात समाजकंटकांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.दरम्यान, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद हालचाल, अनोळखी व्यक्ती किंवा संशयित वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलीस तसेच ग्रामपंचायत लोहशिंगवे यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande