गडचिरोलीत काँग्रेसमधील नवख्यांचं शक्तिप्रदर्शन, जुन्यांचा सामूहिक राजीनामा
गडचिरोली., 27 मे (हिं.स.) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच गडचिरोली काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षात उभी फूट पडली असून, एकाच वेळी ''मशिनरी'' आणि ''नाराजी'' दोन
गडचिरोली कॉंग्रेस मध्ये जिल्हाध्यक्षाच्या निवडीवरून उफाळला असंतोष.पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


गडचिरोली., 27 मे (हिं.स.)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच गडचिरोली काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षात उभी फूट पडली असून, एकाच वेळी 'मशिनरी' आणि 'नाराजी' दोन्हीचा स्फोट पाहायला मिळत आहे. १० तालुकाध्यक्षांसह तब्बल १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठून सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका बाजूला जल्लोष: कोवासे यांचे दणदणीत शक्तिप्रदर्शन

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर, २६ मे रोजी त्यांच्या समर्थकांनी शहरात भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पदग्रहण सोहळ्याला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती यावेळी आमदार विजय वडेट्टीवार (विधीमंडळ गटनेते), माजी मंत्री वसंत पुरके, कुणाल चौधरी (महाराष्ट्र प्रभारी), आमदार अभिजित वंजारी, आणि माजी खासदार मारोतराव कोवासे आदींची उपस्थिती होती.

निष्ठावान आणि संयमी कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये योग्य वेळी संधी मिळते, सर्वांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

दुसऱ्या बाजूला बंड: 'महेंद्र ब्राह्मणवाडे' यांच्यासाठी १०० पदाधिकारी मुंबईत!

कोवासे यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा होत असतानाच, दुसरीकडे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या समर्थकांनी थेट बंडाचे निशाण फडकावले आहे.

काय घडलं मुंबईत?जिल्ह्यातील १० तालुकाध्यक्षांसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी मुंबईत ठाण मांडले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले.

नाराज गटाचा थेट इशारा:ब्राह्मणवाडे यांना पुन्हा संधी देण्यात यावी. जर प्रदेश पातळीवर यावर योग्य निर्णय झाला नाही, तर आम्ही थेट दिल्ली गाठून हायकमांडकडे दाद मागू!

पक्षासाठी धोक्याची घंटा का?

गटबाजी चव्हाट्यावर: नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न आणि स्थानिक पातळीवरील जुन्या कार्यकर्त्यांची उघड बंडखोरी यांमुळे पक्ष दोन गटात विभागला गेला आहे.

निवडणुकांवर परिणाम: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेला हा अंतर्गत स्फोट काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.आता काँग्रेस श्रेष्ठी या 'गडचिरोलीतील भूकंपावर' काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande