
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुप्त बैठका
मनमाड, 27 मे (हिं.स.)। राज्यभरात विधान परिषदेच्या २६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. या घोषणेमुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक आणि नगरसेविकांचे भाव भलतेच वधारले आहेत. सध्या नांदगाव आणि मनमाड नगर परिषदेच्या वर्तुळात केवळ 'लक्ष्मी दर्शन' आणि 'परराज्यातील सहली' यांवरच चर्चा रंगताना दिसत आहे.कोणाला जागा सुटणार? उमेदवार कोण? सगळंच गुलदस्त्यात असतानाही याबाबत रोज चहाच्या टपरी पासून ते पानटपरी पर्यत चर्चा सुरू आहे यात सत्ताधारी नगरसेवक तर विरोधकांच्या संपर्कात असुन आमचं काय ते बघा आम्ही बरोबर कार्यक्रम करू असे गुप्तपणे निरोप पाठवत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
या निवडणुकीत कोणत्या पक्षाला जागा सुटणार आणि महायुती किंवा महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार मैदानात उतरणार, हे अद्याप पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. मात्र, राजकीय गणिते काहीही असो, आपल्याला काय मिळणार, यावरच सध्या नगरसेवकांचा मुख्य डोळा आहे. उमेदवार कोणीही असो, आम्हाला कोण जास्त पैसे देईल आणि सहलीला कुठे घेऊन जाईल? असा उघड आणि छुप्या स्वरूपातील संवाद सध्या नगरसेवकांमध्ये सुरू आहे.सत्ताधारी नगरसेवकांच्या विरोधकांसोबत गुप्त बैठका सुरू असुन या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि खळबळजनक बाब म्हणजे, नांदगाव-मनमाडमधील सत्ताधारी गटाच्या काही नगरसेवकांनी थेट विरोधी गटातील प्रमुख नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या आहेत. उमेदवारी कोणालाही मिळो, ऐनवेळी आमच्याकडे योग्य ते लक्ष राहू द्या, अशी थेट मागणी या नगरसेवकांनी विरोधकांकडे केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या गुप्त बैठकांमुळे स्थानिक राजकारणात अंतर्गत बंडाळी आणि फोडाफोडीची शक्यता बळावली आहे. बहूमत फुटू नये म्हणून निवडणुकीच्या काळात मतदारांना (नगरसेवकांना) अज्ञातस्थळी किंवा परराज्यात सहलीला नेण्याची राजकीय परंपरा आहे. यासाठी गोवा, महाबळेश्वर,हैदराबाद, गुजरात किंवा थेट राजस्थानमधील रिसॉर्ट्स बुक करण्याची प्राथमिक चाचपणी काही इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे. त्यामुळे 'पॅकेज' नेमके काय असेल, यावरच सध्या नगरसेवक खमंग चर्चा करत आहेत.एकंदरीत, अद्याप उमेदवारांची नावे निश्चित नसली, तरी नांदगाव-मनमाडच्या राजकीय गोटात 'लक्ष्मी दर्शन' आणि 'सहलीच्या' डोहाळ्यांनी निवडणुकीची रंगत आधीच वाढवली आहे.
विधानपरिषद निवडणुकीला घोडेबाजाराची परंपरा..!
निवडणूक आयोगाने कितीही आचारसंहिता लावली कितीही पारदर्शकता ठेवली तरी निवडणूक काळात पैशाचा आणि दारूचा महापूर वाहतो यात अनेक प्रलोभने देऊन मतदारांना आकर्षित केले जाते याला विधानपरिषद निवडणूक कशी अपवाद राहील या निवडणुकीलाही घोडेबाजाराची परंपरा आहे या निवडणुकीत बहुमत नसतानाही व केवळ एक नगरसेवक असलेल्या पक्षांचे उमेदवारदेखील निवडून आल्याचा इतिहास आहे त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीलाही घोडेबाजाराची परंपरा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV