
लातूर, 27 मे (हिं.स.)। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे पथ संचलन; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज!
बकरी ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेचे वातावरण कायम राहावे, या उद्देशाने अहमदपूर पोलीस दलाच्या वतीने बुधवारी शहराच्या मुख्य भागातून भव्य 'रूट मार्च' (पथसंचलन) काढण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले.
हे पथसंचलन पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरून मार्गस्थ झाले. यात प्रामुख्याने हिना लॉज परिसर, आझाद चौक व मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक, नांदेड रोड, भाग्यनगर, इदगाह आणि इदगाह चौक या प्रमुख मार्गांवर पोलिसांनी संचलन करत नागरिकांना सुरक्षेचा विश्वास दिला. सण-उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि अफवांना थारा मिळू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास राठोड, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, रवी बुरकुले, स्मिता जाधव,पोलीस कर्मचारी तानाजी आरदवाड, बबन चपडे, हनुमंत आरदवाड, सुकेश केंद्रे, पद्माकर पांचाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस जवान आणि होमगार्ड या सहभागी झाले होते
यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले म्हणाले की, बकरी ईदचा सण सर्वांनी शांततेत, उत्साहात आणि बंधुभावाने साजरा करावा. शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis