
विकासकामांना येणार गती : प्रशासन अन् मनपाला मोठा दिलासा
नाशिक, 27 मे (हिं.स.) - नाशिकमधील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता मोठा दिलासा मिळाला आहे. आचारसंहितेमुळे अडथळा येण्याची शक्यता असलेल्या कुंभमेळा संबंधित तसेच अत्यावश्यक विकासकामांना आता सूट देण्यात आली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्रातील १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकांमुळे संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात नवीन कामांना मंजुरी किंवा सुरू असलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणे मर्यादित होते. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाची तयारी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी नाशिक प्रशासनाने विशेष विनंती केली होती.
जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर राज्यस्तरीय छाननी समितीने २१ मे २०२६ रोजी चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. आयोगाने २२ मे २०२६ रोजी या प्रस्तावास मंजुरी देत कुंभमेळा संबंधित कामांना आचारसंहितेच्या निबंधातून वगळण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे रस्ते सुधारणा, घाट विकास, पाणीपुरवठा योजना आणि भाविकांसाठीच्या सुविधा यांसारखी कामे आता वेगाने पुढे नेता येणार आहेत. आचारसंहितेमुळे थांबलेली प्रशासकीय प्रक्रिया पुन्हा सुरळीत होणार असल्याने नाशिक प्रशासन आणि महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV