
लातूर, 28 मे (हिं.स.)।
: नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणानंतर
गेली अनेक दिवसांपासून लातूर येथे तळ ठोकून असलेले सीबीआयचे पथक पेपर फुटीचे धागेदोरे उदगीरपर्यंत पसरल्याने उदगीर येथील एक डॉक्टर संशयीत असल्याची शक्यता असल्याने सीबीआयचे पथक आज उदगिरात दाखल झाले आहे, अशी माहिती उपलब्ध होत आहे.
नीट परीक्षा पेपर फुटल्यापासून लातूरचे वैद्यकीय क्षेत्र अक्षरशः हादरून गेले आहे. या प्रकरणात शहरातील अनेक डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात आहेत. यापुर्वी काही डॉक्टरांना अटकही
केली आहे. आणखी तीन ते चार डॉक्टरांना सीबीआय नोटीस देण्याची शक्यता आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत प्रा. मोटेगावकरसह जेवढ्यांना अटक करण्यात आली आहे. त्या
सर्वांना सीबीआयने अगोदर नोटीस देऊन पुण्यात बोलावून घेत अटक दाखविली आहे. अद्यापही सीबीआयचे पथक लातूर येथे ठाण मांडून आहे. आज हे पथक उदगिरात दाखल झाले असून
उदगीर येथील एका डॉक्टरची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. आज उदगीर शहरामध्ये पेपर फुटी प्रकरणात उदगिरातील नेमका डॉक्टर कोण अशी चर्चा चालू आहे. उदगीर शहरातील या डॉक्टरने
फुटलेला पेपर पुढे पाठवून पैसे घेतले की स्वतःच्या नातेवाईकासाठी त्या पेपरचा वापर केला हे सीबीआय तपासानंतरच लक्षात येणार आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात रोज नवनवीन नावे पुढे येत असल्याने डॉक्टर, क्लासेस चालक, काही विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्यात सीबीआयची चांगलीच धडकी भरली आहे. नीट प्रकरणात चौकशी झालेल्या काही डॉक्टरांना नोटीसा देण्यात आल्याचे वृत्त आहे. ते कें व्हाही पुणे सीबीआय ऑफीसकडे रवाना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआयची नोटीस म्हणजे संबंधीतांना अटक करण्याची रंगीत तालीम समजली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis