
नांदेड, 28 मे (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी, नांदेड उत्तर ग्रामीण यांच्या वतीने पूर्णा रोड येथील ‘अनंता लॉन्स’ येथे आयोजित दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सावरकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यशाळेचा उद्देश पक्षाची विचारधारा अधिक दृढ करणे, संघटन कौशल्य विकसित करणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रसार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी भीमराव केराम, सुनील राणे, नितीन काळे, संजय कौडगे, चैतन्य बापू देशमुख, संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख आणि किशोर स्वामी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यशाळेमुळे संघटनात्मक क्षमता वाढेल आणि पक्षकार्य अधिक प्रभावीपणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
--------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis