
रत्नागिरी, 28 मे, (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात आज दुपारी केमिकल्सने भरलेल्या टँकरचा अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास परशुराम घाट उतरत असताना केमिकल्सने भरलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, चालक गाडीखाली अडकून जागीच ठार झाला. अपघातानंतर टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चिपळूण नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी पोहोचली असून बचाव आणि मदतकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी परिसर सुरक्षित करून वाहतूक सुरळित करण्याचे प्रयत्न सुरू केले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी