नाशिक-बकरी ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण
नाशिक, 28 मे (हिं.स.) मुस्लीम बांधवांनी बकरी ईद निमित्ताने त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहर - ए - खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक पद्धतीने सामूहिक नमाज पठण केले. या सामूहिक नमाज पठणच्या निमित्ताने मुस्लीम बांधव म
नाशिक-बकरी ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण


नाशिक, 28 मे (हिं.स.) मुस्लीम बांधवांनी बकरी ईद निमित्ताने त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहर - ए - खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक पद्धतीने सामूहिक नमाज पठण केले.

या सामूहिक नमाज पठणच्या निमित्ताने मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर आल्याने उत्साहाचे वातावरण होते. त्याकरीता महापालिका व पोलीस प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली होती. बकरी ईदनिमित्त कुर्बानीच्या प्रथेसाठी बोकड बाजारात मोठी तेजी दिसून आली. १५ हजारांपासून २ लाखांपर्यंतचे बोकड विक्रीसाठी आले होते. बोकड खरेदीसाठी काल उशिरापर्यंत बाजार गजबजलेला होता.

नमाजसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. तत्पूर्वी काल रात्रीच वरिष्ट अधिकाऱ्यांनी ईदगाह मैदानाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. मैदान सपाटीकरणाच्या दृष्टीने खड्डे बुजवून सुरळीत करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात जागोजागी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक व साध्या गणवेशातील पोलीसही तैनात करण्यात आले होते.

ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर प्रार्थना झाली. यावेळी शहर-ए खतीब यांच्याकडून सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, शासनाने व पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सण उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले जात होते. दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध मशिदींसह मुख्य ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. तसेच महानगरपालिके तर्फे ईदगाह मैदानाची स्वच्छता, खड्डे बुजवणे, पिण्याच्या पाण्याची सोय आणि नमाजापूर्वी मुस्लीम बांधवांसाठी तात्पुरते वजू खाना उभारण्यात आले होते. त्या दृष्टीने मशिदीमध्येही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. बकरी ईदनिमित्ताने कुर्बानी करताना कुठल्याही प्रकारचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. आज मुस्लीम बांधव नमाज पठणासाठी

मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले होते. सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, अण्णाभाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल, सीबीएस सिग्नल, तालुका पोलीस स्टेशन समोर व टिळकवाडी सिग्नल येथे पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतुकीवर नियंत्रण करण्यात येत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande