
दत्ता शिर्केंनी पुढे आणला पुरोगाम्यांचा दळभद्री चेहरानागपूर, 28 मे (हिं.स.) : आदिवासींच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांना बंदुकीच्या सावटाखाली ठेऊन भय निर्माण करणे, तरुणांना स्वप्नरंजनात ठेऊन भ्रमात टाकणे आणि खंडणीच्या रूपाने भ्रटाचार माजवणे या सर्व गोष्टी एकत्र आल्या की त्याचे नाव नक्षलवाद होते. हा नक्षलवाद ज्या विचारसरणीवर फोफावतो ते चेहऱ्याला पावडर लावलेले फंगस म्हणजे अर्बन नक्षलवाद (वैचारिक) असल्याचा भंडाफोड जन संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांनी केला. नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी अनुवलेले दाहक वास्तव मांडून तथाकथित पुरेगाम्यांचा दळभद्री चेहरा जगापुढे आणला.
आदिवासी उत्थानासाठी दत्ता शिर्के यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या कार्यप्रवासाचे अनुभव जाणुन घेण्यासाठी आभा मुळे यांनी प्रगट मुलाखतीतून संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात अनुभव मांडताना शिर्के यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या नक्षलबाडी गावातून 1967 साली उत्पन्न झालेले हे लाल वादळ (नक्षलवाद) कुठल्याच कालखंडात कुणासाठीही हितावह नव्हते. गरीब, आदिवासी, कामगार, तरूण, समाज आणि देशाचे मोठे अहित या विचारधारेने केले. नक्षलवादाने झारीतील शुक्राचार्य बनुन दुर्गम आदिवासी भागातील विकास अनेक दशके रोखून धरल्याचे शिर्के यांनी सांगितले. विद्यार्थी दशेत असताना शिर्के यांचा आदिवासी भागाशी पहिला संबंध आला. त्यावेळी तिथली बिकट परिस्थिती त्यांनी प्रत्यक्षात अनुभवली.
घनदाट अरण, मूलभूत सुविधांचा अभाव, गरिबी, निरक्षरता यात तुमच्या-आमच्या सारखी हाडामांसाची माणसे स्वातंत्र्यानंतरही खितपत पडलेली पाहून शिर्के चिंतेत पडले आणि चिंतनात गेले. त्यामुळे उच्च विद्याविभूषीत असूनही त्यांना शहरातील सुखासिनता अस्वस्थ करीत होती. यातूनच त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि जंगलाचा रस्त धरला. प्रारंभी त्यांनी प्रा. अरविंद सोहनी यांच्यासह ‘भूमकाल’ संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला आपली कर्मभूमी बनवले. यावेळी त्यांनी नक्षलवादाचा पोकळ पाया आणि त्याची पाठराखण करणारे शहरी बाजारबुणगे यांच्या दुटप्पी आणि बेईमान वागण्याचा दाहक अनुभव घेतला.
कालांतराने शिर्के यांनी जन संघर्ष समितीची स्थापना करून आदिवासी क्षेत्रात बारूद आणि बंदुकीचा सामना करत विकास नेण्याचा चंग बांधला. पत्रु दुर्गेच्या निर्दयी हत्याकांडाचा शिर्के यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. मुलाखती दरम्यान देखील पत्रुचा उल्लेख होताच त्यांचे डोळे पाणावले. नक्षलवादी निर्दयीपणे विकासाची स्वप्न पहाणारे डोळे फोडून टाकत असल्याचा वास्तवाने शिर्के यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. परंतु, या भयाने खचून न जाता त्यांनी आपले काम सुरू ठेवले. जन संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून भामरागड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पूल आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी समितीने केलेले कार्य आज अनेक गावांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या आदिवासी समाजाला नव्या भविष्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम समिती करत आहे.एकेकाळी स्वतःच्या गावापुरते मर्यादित राहिलेले अनेक आदिवासी विद्यार्थी आज शिक्षणाच्या माध्यमातून बाहेरील जगाशी जोडले जात आहेत. या परिवर्तनामागे जन संघर्ष समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समाजजागृतीचे कार्य आहे. दत्ता शिर्के यांनी माओवाद्यांच्या दहशतीचा सामना करत शिक्षण साहित्य, शैक्षणिक मदत आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी अविरत काम केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत.
अनेक गावांना जोडणारा पूल हा जन संघर्ष समितीच्या विकासकार्याचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे अनेक गावांचा संपर्क सुलभ झाला. यामुळे आरोग्य सेवा, शिक्षण आणि दैनंदिन जीवनातील सुविधा आदिवासी भागांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले. या उपक्रमात पोलिस प्रशासनानेही महत्त्वाची साथ देत विकासाच्या कार्याला बळ दिले.दरम्यान, माडवी हिडमासारख्या नक्षल नेत्यांचे उदात्तीकरण करून आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न काही घटकांकडून केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात विकास, शिक्षण आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणारे लोकच आदिवासींचे खरे हितचिंतक असल्याचे जन संघर्ष समितीच्या कार्यातून स्पष्ट होत आहे.
राजकीय इच्छा शक्ती महत्त्वाची
नक्षलवादावर भाष्य करताना शिर्के यांनी सांगितले की, कुठल्याही समस्येवर फुकटचे सल्ले देण्याचे काम आमच्या व्यवस्थेला फार चांगले जमते आणि समस्येच्या सोडवणुकीसाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती पूर्वी इथल्या राजकीय व्यवस्थेत नव्हती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प सोडला. तसेच त्यांनी या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती पावले उचलली त्यामुळे आदिवासींचे भावविश्व असलेले जल, जंगल आणि जमीन आजघडीला मोकळा श्वास घेतेय. समस्येवर पोकळ चिंतनाऐवजी प्रत्यक्ष कृतीची गरज असते आणि ती कृती वर्तमान राजकीय व्यवस्थेने केल्याबद्दल शिर्के यांनी समाधान व्यक्त केले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis