नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र दिंडी मार्गाची मागणी
त्र्यंबकेश्वर, 28 मे (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर वारकरी भाविकांसाठी स्वतंत्र दिंडी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातील भाविकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. वार्षिक पालखी सोहळे, धार्मिक यात्रा आणि वाढती भाविकांची संख्
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र दिंडी मार्गाची मागणी


त्र्यंबकेश्वर, 28 मे (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर वारकरी भाविकांसाठी स्वतंत्र दिंडी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातील भाविकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. वार्षिक पालखी सोहळे, धार्मिक यात्रा आणि वाढती भाविकांची संख्या लक्षात घेता सुरक्षित व स्वतंत्र दिंडी मार्गाची गरज व्यक्त केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर येथून दरवर्षी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. तसेच संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त सुमारे 600 दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात. याशिवाय आषाढी आणि कार्तिकी एकादशी, श्रावण महिन्यातील कावड यात्रा, साई पालख्या तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वारकरी आणि पायी प्रवास करणाऱ्या भाविकांची वर्दळ असते.

भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे नाशिक-त्र्यंबक मार्गावर वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहन वाहतुकीपासून वेगळा आणि सुरक्षित दिंडी मार्ग उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही अनेकदा ही मागणी करण्यात आली असून, सध्या ती पुन्हा पुढे आली आहे.

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, रस्त्याची रुंदी मर्यादित असल्याने आणि काही ठिकाणी उपलब्ध जागा लक्षात घेऊन स्वतंत्र दिंडी मार्गासाठी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

पुढील सहा महिन्यांत कुंभमेळ्याचा पर्वकाल सुरू होणार असून, आगामी पावसाळ्यामुळेही भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने दिंडी मार्गाच्या प्रस्तावाला गती द्यावी, अशी अपेक्षा वारकरी भाविकांनी व्यक्त केली आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande