नांदेडच्या रेल्वे विकासासाठी गोपछडे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
नांदेड, 28 मे (हिं.स.) : पुणे-नांदेड आणि हैदराबाद-नांदेड वंदे भारत सेवा तातडीने सुरू करावी तसेच हजूर साहिब नांदेड येथे वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांसाठी कोच आणि मेंटेनन्स डेपो उभारण्यात यावा, अशी प्रमुख मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रे
Q


नांदेड, 28 मे (हिं.स.) : पुणे-नांदेड आणि हैदराबाद-नांदेड वंदे भारत सेवा तातडीने सुरू करावी तसेच हजूर साहिब नांदेड येथे वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांसाठी कोच आणि मेंटेनन्स डेपो उभारण्यात यावा, अशी प्रमुख मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

दिल्ली येथे झालेल्या भेटीत खा. गोपछडे यांनी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी व्यापक आराखडा सादर केला. नांदेड इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेडचे काम लवकर पूर्ण करणे, नांदेड स्थानकावरील पिट लाईन मालटेकडी स्थानकाकडे स्थलांतरित करून तेथे आधुनिक रेल्वे सुविधा विकसित करणे, अशीही मागणी त्यांनी केली.

नांदेड-लातूर रोड आणि नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम गतीने पूर्ण करावे तसेच बोधन-बिलोली-नरसी-लातूर रोड (१३४ किमी) प्रस्तावित रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी विनंतीही करण्यात आली. धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक’ असे करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.

हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा, हरित आणि पर्यावरणपूरक विकास व्हावा, अशी मागणी करताना सौर ऊर्जा प्रणाली, पावसाच्या पाण्याचे संकलन, डिजिटल माहिती प्रणाली, मल्टीलेव्हल पार्किंग, पर्यटक माहिती केंद्र, सुशोभीकरण, स्वतंत्र प्रतीक्षालये आणि आधुनिक स्वच्छता व्यवस्था यांसारख्या सुविधा विकसित करण्याचा आराखडा सादर करण्यात आला.

स्थानक पुनर्विकासापूर्वी दोन नवीन प्लॅटफॉर्म उभारणे आणि नांदेडच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पीय संकल्पना प्रकल्पात समाविष्ट करण्यावरही भर देण्यात आला.

रेल्वे संपर्क विस्तारासाठी जालना-नांदेड-काचीगुडा-तिरुपती ‘पुष्करिणी एक्सप्रेस’, नांदेड-सावंतवाडी एक्सप्रेस, नांदेड-धुबरी साहिब-तीनसुकिया अमृत भारत सेवा, तसेच इतर नवीन आणि विस्तारित रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली.

याशिवाय नांदेड-मुंबई वंदे भारत प्रवास वेळ आठ तासांच्या आत आणणे, नांदेड-जालना मार्गावर 130 किमी प्रतितास सेक्शन स्पीड मंजुरी, अंकाई, लातूर रोड आणि परळी वैजनाथ बायपास प्रकल्पांना गती देणे, तसेच उमरी-धर्माबाद-बासर मार्गावरील अंडरब्रिज काम तातडीने पूर्ण करणे यावरही भर देण्यात आला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande