वडवणी तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे १८ क्विंटल कापूस जळून खाक
बीड, 28 मे (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेत १८ क्विंटल कापूस आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे ८ लाख र
वडवणी तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे १८ क्विंटल कापूस जळून खाक


बीड, 28 मे (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेत १८ क्विंटल कापूस आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकरी यशवंत कुलकर्णी यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण घराला वेढा घातला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने घरातील मौल्यवान साहित्य तसेच साठवून ठेवलेला कापूस वाचवणे शक्य झाले नाही.

या आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून, कष्टाने पिकवलेला ‘पांढरा सोना’ समोरच जळताना पाहून कुलकर्णी कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आगीत घरातील धान्य, फर्निचर, कपडे आणि इतर आवश्यक साहित्यही नष्ट झाले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande