लातूर - कॅनॉल पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचे आंदोलन; पाणी सोडण्याचे मिळाले आश्वासन
लातूर, 28 मे (हिं.स.)। लातूर–कळम रोडवरील तांदूळवाडी येथील मांजरा पट्टा परिसरात कॅनॉलच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील दहा वर्षांपासून कॅनॉलद्वारे शेतीसाठी नियमित पाणीपुरवठा होत नसल्यान
आंदोलन


लातूर, 28 मे (हिं.स.)। लातूर–कळम रोडवरील तांदूळवाडी येथील मांजरा पट्टा परिसरात कॅनॉलच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील दहा वर्षांपासून कॅनॉलद्वारे शेतीसाठी नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कळम धरणातून कॅनॉलद्वारे या परिसरातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे काडगाव, मांजरी, साखरा, तांदूळवाडी, टाकळी, हरंगुळ आणि जेवळी येथील अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या पार्श्वभूमीवर तांदूळवाडी येथील कॅनॉल परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मांजरा प्रकल्पाचे निकम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेत जिल्हास्तरीय अधिकारी तसेच संबंधित विभागातील पाटील यांच्याशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा देत ३० तारखेपर्यंत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगितले.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडून एपीआय केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनात ॲड. गणेश गोमचाळे, बोराडे नाना, तानाजी कोद्रे, प्रकाश गोमचाळे, काकाजी मोरे, सुशील कोद्रे, ओम कोद्रे, काडगाव व तांदूळवाडीचे सरपंच तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande