
अमरावती, 28 मे (हिं.स.)
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून खरीप हंगामाच्या तयारीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेग दिला आहे. रासायनिक खतांच्या संभाव्य दरवाढीची चर्चा सुरू असल्याने शेतकरी आतापासूनच डीएपी, यूरिया, एनपीके आदी खतांची खरेदी करण्यासाठी कृषी सेवाकेंद्रांकडे धाव घेत आहेत. अनेक शेतकरी आगाऊ पैसे भरून खते बुक करून ठेवत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावा गावात पाहायला मिळत आहे. खरीप पेरणीच्या काळात खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो तसेच अचानक दरवाढ झाल्यास आर्थिक फटका बसू नये, यासाठी शेतकरी आधीच नियोजन करीत आहेत. नेरपिंगळाई परिसरातील कृषी केंद्रांवर सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी होत असून काही ठिकाणी खतांचा मर्यादित साठा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर पिकांसाठी लागणाऱ्या खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नंतर खते मिळाली नाहीत तर पेरणी खोळंबेल, या भीतीने अनेक शेतकरी आवश्यकतेपेक्षा जास्त खते आगाऊ निश्चित करून ठेवत आहेत. काही शेतकऱ्यांनी उधारीवरही खते बुक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बियाणे, औषधे, मजुरी आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे आधीच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यात खतांच्या संभाव्य दरवाढीमुळे खरीप हंगाम अधिक खर्चिक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने पुरेसा खतसाठा उपलब्ध करून दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी नेरपिंगळाई परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कमी पाऊस झाल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, एकीकडे अवकाळी आणि अनिश्चित हवामान तर दुसरीकडे वाढता उत्पादन खर्च अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी