
नांदेड, 28 मे (हिं.स.) : धर्माबाद येथील डॉ. अण्णाभाऊ साठे नगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारक व आधुनिक वाचनालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला समाजबांधव, नागरिक, युवक-युवती आणि अण्णाभाऊ साठे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
समाज प्रबोधनकार, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणे, समाजात शिक्षण व सामाजिक जागृती वाढवणे तसेच नव्या पिढीला अभ्यासासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने या स्मारक व वाचनालयाची उभारणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्माबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. संगीता शंकर बोलमवार या होत्या. उद्घाटन मोईज करखेलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ताहेर पठाण, व्ही. जी. डोईवाड, लक्ष्मण निदानकर, सिद्धोधन हाणमंते, नागोराव कमलाकर आणि सत्यनारायण पवळे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज असल्याचे प्रतिपादन केले. हे स्मारक आणि वाचनालय समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान “जय लहुजी, जय अण्णा”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देविदास निदानकर, शिवराम भंगारे, शंकर गोणारकर, सुरेश निदानकर, श्रीकांत वाघमारे तसेच साठे नगर परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis