
अमरावती, 28 मे (हिं.स.) : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या शुक्रवार दुपारी अमरावती दौऱ्यावर येणार असून, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.यावेळी पालकमंत्री बावनकुळे हे भाजपचा अधिकृत ‘बी फॉर्म’ प्रवीण पोटे पाटील यांना सुपूर्त करणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली .
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची मोठी रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि रॅलीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष याकडे लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी