
छत्रपती संभाजीनगर, 28 मे (हिं.स.) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या 30 मेपासून आंतरवाली सराटी येथे रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी कठोर भूमिका जाहीर केली.
सरकारला गेल्या दहा महिन्यांपासून वेळ दिला होता, मात्र सातारा गॅझेटिअर संदर्भात अद्याप शासन निर्णय (जीआर) काढण्यात आलेला नाही, अशी टीका जरांगे यांनी केली. “मला आता चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
यापूर्वी सावलीत, मंडपात किंवा फॅनच्या सुविधांमध्ये उपोषण केले जात होते. मात्र यावेळी अंतिम आणि अधिक कठोर स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले. “रखरखत्या उन्हात बाज टाकून उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार, ना अन्न घेणार आणि पायात चप्पलही घालणार नाही,” असे जरांगे म्हणाले.
“माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे, त्यामुळे आता स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. तसेच “उष्माघातामुळे काही झाले तर त्याला सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असा आरोपही त्यांनी केला.
आमरण उपोषण जंगलात, रानात किंवा कडक उन्हात कुठेही करण्याचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल,” असे म्हणत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीन वर्षे पूर्ण होत असून, मे महिन्याच्या तीव्र उन्हात हे उपोषण करण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis